विमाननगर मध्ये स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पाच तरुणींची सुटका
पुणे : शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘सिग्नेचर स्पा’ या ठिकाणी देहविक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत पाच पीडित तरुणींची सुटका केली.
पहा व्हिडिओ
सुटका करण्यात आलेल्या तरुणी उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्ली येथील असून, त्यांना आर्थिक प्रलोभन दाखवून स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी स्पा चालक मेहबूब खान लष्कर याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना सिग्नेचर स्पामध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने नियोजनबद्धरीत्या छापा टाकला. या कारवाईत संबंधित ठिकाणी देहविक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी पीडित तरुणींना सुरक्षित ठिकाणी हलवून पुढील चौकशी सुरू केली असून, या रॅकेटमागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे. शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
—