कोंढव्यात सराफी पेढीतून २.६८ लाखांचे दागिने लंपास
खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : पुणे शहरातील कोंढवा भागात खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत प्रवेश करून दोन बुरखाधारी महिलांनी तब्बल दोन लाख ६८ हजार रुपये किमतीचा सुवर्णहार चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा खुर्द येथील एका सराफी पेढीच्या मालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, बुरखा परिधान केलेल्या दोन महिला दुकानात आल्या होत्या. त्यांनी कर्मचाऱ्याला विविध सुवर्णहार दाखवण्यास सांगितले. दरम्यान, कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून त्यांनी संधी साधत दोन लाख ६८ हजार रुपये किमतीचा सुवर्णहार लंपास केला.
चोरीचा प्रकार लक्षात येताच दुकानदाराने तात्काळ कोंढवा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. चोरी करून फरार झालेल्या महिलांचा शोध सुरू असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन थोरात करीत आहेत. सराफी व्यापाऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
—