पुण्यात डेटिंग अॅपच्या माध्यमातून लूट करणारी टोळी गजाआड; कोंढवा पोलिसांची कारवाई; पाच आरोपी अटक, शस्त्र व दुचाकी जप्त
पुणे : डेटिंग अॅपच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढून लूट करणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोबाईल फोन, लोखंडी कोयता तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९/२०२६ अन्वये दि. २० जानेवारी २०२६ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीला डेटिंग अॅपद्वारे संपर्क साधत रात्री मोकळ्या मैदानात भेटीस बोलावण्यात आले. त्यानंतर आरोपींनी लोखंडी हत्याराचा धाक दाखवून फिर्यादीचा मोबाईल फोन, सोन्याची चैन, अंगठी काढून घेतली तसेच एटीएममधून जबरदस्तीने पैसे काढून लुटले.
या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व संशयित मोबाईल नंबरच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींची ओळख निष्पन्न झाली. पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व सुहास मोरे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार कोंढवा बुद्रुक परिसरातील ए.जे. कंपनीजवळ, डी-मार्ट समोरील सोमजी भागात सापळा रचून मुख्य आरोपी राहील शेख याला अटक करण्यात आली.
यानंतर त्याच्यासह एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारचे आणखी दोन गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींकडून तीन मोबाईल फोन, लोखंडी कोयता तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत असून डेटिंग अॅप वापरणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.