ई-सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री; पुण्यात दोन कारवायांत सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : ई-सिगारेट तसेच तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्री, साठवणूक आणि जाहिरातींवर बंदी असतानाही पुणे शहरात या पदार्थांची सर्रास बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. कोरेगाव पार्क आणि लष्कर (कॅम्प) परिसरात पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांत सुमारे ५ लाख ३१ हजार रुपयांचा ई-सिगारेट, व्हेप, हुक्का फ्लेवर व तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत कोरेगाव पार्क परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक-२ गुन्हे शाखेने छापा टाकत ३१ (वय २८, मूळ गाव उपळा, ता. मंगलपाडी, जि. कासरकोड, केरळ) याच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या ई-सिगारेट (व्हेप), हुक्का फ्लेवर व तंबाखुजन्य पदार्थ असा २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक-२ मधील पोलीस हवालदार पृथ्वीराज किसन पांडुळे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय करपे करत आहेत.
दरम्यान, लष्कर (कॅम्प) परिसरातील बाटा चौक येथील ‘स्मोकर्स डेन’ आणि ‘स्मोकर्स कॉर्नर’ या दुकानांवर २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात बंदी घालण्यात आलेले पदार्थ आढळून आले. या कारवाईत अहमदनिवास अब्दुलरहेमान (वय २८, रा. भवानी पेठ) आणि शानु अब्दुल्ला (वय २३, रा. कॅम्प) यांच्या ताब्यातून ५ लाख ५ हजार ४०० रुपयांचे ई-सिगारेट, व्हेप, हुक्का फ्लेवर व तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक-२ मधील पोलीस शिपाई शुभांगी म्हाळसेकर यांनी फिर्याद दिली असून तपास लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कदम करत आहेत.
दोन्ही प्रकरणांत आरोपींविरोधात इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम २०१९ मधील कलम ७ व ८ तसेच संबंधित तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.