अक्कलकोटमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी; १० दिवसांत १२ लाखांहून अधिकांनी महाप्रसादाचा लाभ
अक्कलकोट : सलग सुट्ट्यांमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली आहे. गेल्या दहा दिवसांत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामार्फत १२ लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून, सरत्या वर्षातील हा उच्चांक ठरला आहे.
वर्षाअखेरीस दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मुंबई–पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागांबरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात, दिव–दमण, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार तसेच काश्मीर पंडित समुदायातील भाविकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. याशिवाय परदेशातूनही लाखो भाविकांनी अक्कलकोटला भेट दिली.
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाने भाविकांसाठी उत्कृष्ट नियोजन केले होते. वाढलेल्या गर्दीचा विचार करून अन्नदानाची वेळ वाढविण्यात आली होती, त्यामुळे भाविकांना सुरळीतपणे महाप्रसाद मिळाला.
दरम्यान, सोलापूर येथील विविध रक्तपेढ्यांच्या सहकार्याने अन्नछत्र मंडळाच्या परिसरात आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो स्वामी भक्तांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
भाविकांची सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी मंदिर व न्यास परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे दर्शन व महाप्रसाद व्यवस्था सुरळीत पार पडली.