ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रात ऐतिहासिक यश
प्रा. संदीप उत्तम चोपडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
पुणे : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या सुमतिभाई शाह आयुर्वेद महाविद्यालय, हडपसर (पुणे) येथील ग्रंथपाल व ग्रंथालय विभागप्रमुख प्रा. संदीप उत्तम चोपडे यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एम. जी. एम. विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या आंतर विद्याशाखेअंतर्गत ही पदवी शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली.

या यशाबद्दल दि. २० डिसेंबर २०२५ रोजी कुलगुरू कार्यालय, एम. जी. एम. विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात मा. कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ यांच्या हस्ते प्रा. चोपडे यांना पीएच.डी. पदवीचे अधिसूचनापत्र (नोटिफिकेशन) प्रदान करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. एच. एच. शिंदे, आंतर विद्याशाखेअंतर्गत अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई, मार्गदर्शक डॉ. रसिका आर. वडाळकर (ग्रंथपाल व सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग) तसेच श्री. विलास जाधव उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे एम. जी. एम. विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातील पहिले पीएच.डी. विद्यार्थी होण्याचा मान प्रा. संदीप चोपडे यांना प्राप्त झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मा. कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.