पुणे: एक फरशी, तीन कैदी, आणि एक मृत्यू – येरवडा कारागृहातील धक्कादायक घटना – वाचा सविस्तर
पुणे – येरवडा कारागृहातील बराक क्रमांक १ मध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन कैद्यांनी एकावर फरशीने हल्ला करून त्याचा मृत्यू होण्याची परिस्थिती निर्माण झाली. मृतकाचे नाव विशाल नागनाथ कांबळे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असून, त्याला १५ डिसेंबर रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास मारहाणीला सामोरे जावे लागले.
सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आलेल्या आरोपी आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. जय जवाननगर) आणि दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांच्यावर आता खुनाचा कलम वाढवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंडालिया, रेड्डी आणि कांबळे यांच्यात कारागृहातच वाद निर्माण झाला. त्यावेळी चंडालिया व रेड्डी यांनी कांबळेवर फरशीचा तुकडा मारून त्याला गंभीर जखमी केले. आरडाओरडा ऐकून कारागृहातील रक्षकांनी धाव घेऊन आरोपींना रोखले; परंतु गंभीर जखमी झालेल्या कांबळेचे उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी त्याचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला.
घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होतात. कारागृहातील सुरक्षा व्यवस्था इतकी ढिसाळ का होती की दोन कैद्यांनी दुसऱ्यावर फरशीने हल्ला करू शकलं? बराकीत रक्षकांनी वेळेत हस्तक्षेप केला, पण त्याचा जीव वाचवता आला नाही. येरवडा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुमन बागवान घटनास्थळी दाखल झाले.
कांबळेच्या मृत्यूची बातमी कळताच, रुग्णालय परिसरात नातेवाइकांची गर्दी झाली, ज्यावर बंडगार्डन पोलिसांनी बंदोवस्त ठेवावा लागला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेने पुन्हा एकदा येरवडा कारागृहातील सुरक्षा, कैद्यांच्या वर्तनावर नियंत्रण आणि रक्षकांची तत्परता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
—