पुणे: विमाननगरात ट्रॅफिकचा खेळखंडोबा; ‘वाहतूक पोलीस सुट्टीवर, नागरिक ड्युटीवर’ अशी अवस्था – व्हिडिओ
पुणे : विमाननगर परिसरातील चौका चौकात मंगळवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणेच वाहतुकीचा ‘महापूर’ उसळला. साकोरे नगरकडे जाणारा रस्ता पूर्णपणे जाम झाला होता. संध्याकाळी आठच्या सुमारास चौका चौकात वाहतूक इतकी विस्कळीत झाली की वाहनचालक नव्हे, तर पादचाऱ्यांचाही संयम सुटला.
पहा व्हिडिओ
विशेष म्हणजे, या सगळ्या गोंधळात वाहतूक विभागाचे कर्मचारी मात्र ‘दृश्यात नसल्याने’ नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागला. “रस्ता आमचा, जबाबदारीही आमचीच!” या भावनेतून काही नागरिकांनी स्वतःच वाहतूक नियंत्रणाची सूत्रे हातात घेतली. चौकात उभे राहून हातवारे करत वाहने पुढे ढकलण्याचे काम नागरिक करत होते, तर अधिकृत वाहतूक व्यवस्था मात्र नामधारी ठरत होती.
दररोज संध्याकाळी याच वेळेत येथे जाम होतो, हे वाहतूक विभागाला माहीत नसावे का? की ‘जाम’ हीच आता अधिकृत व्यवस्था मानली जाते? असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. वाहनांच्या भोंग्यांचा कर्कश आवाज, धुराचे लोट आणि वेळेचा अपव्यय यामुळे चौका चौकात काही काळ अक्षरशः अराजकाची स्थिती निर्माण झाली होती.
वाहतूक नियंत्रणासाठी नेमलेले कर्मचारी नेमके कुठे असतात, असा उपरोधिक प्रश्न विचारत नागरिकांनी वाहतूक विभागाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली आहे. चौका चौकात सिग्नल असो वा नसो, नियंत्रण मात्र ‘नागरिक स्वयंस्फूर्तीवर’च चालते, अशीच स्थिती सध्या विमाननगरमध्ये पाहायला मिळत आहे.
वाहतूक विभागाने वेळेवर उपाययोजना केल्या नाहीत, तर ‘वाहतूक कर्मचारी’ ही पदे फक्त कागदावरच उरतील आणि चौकाचौकात नागरिकांनाच रोज ‘ड्युटी’ करावी लागेल, असा टोमणाही यावेळी लगावण्यात आला.