पिंपरी: दोन कोटींची लाच, पाच कोटींची फसवणूक; वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी बडतर्फ
आयुक्त चौबे यांची कडक कारवाई — भ्रष्ट अधिकाऱ्यांना जबर धक्का
पिंपरी-चिंचवड :
पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या एका गंभीर प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अत्यंत कठोर कारवाई करत वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला सेवेतून बडतर्फ केले आहे. दोन कोटींची लाच मागणे आणि “दाम दुप्पट” नावाखाली कोट्यवधींची फसवणूक करणे या दुहेरी गैरप्रकारांमुळे चिंतामणी याच्यावर कारवाई अपरिहार्य बनली होती.
एसीबीची धडक आणि बेहिशोबी संपत्तीचा शोध
2 नोव्हेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत चिंतामणी याला 46 लाख 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तडजोडीसाठी त्याने तब्बल दोन कोटी रुपये मागितले होते. त्यानंतर झालेल्या घरझडतीत 51 लाखांची बेहिशोबी रोकडही जप्त झाली. आर्थिक गुन्हे शाखेसारख्या संवेदनशील विभागात कार्यरत असताना केलेला हा गंभीर गैरवापर पोलिस दलासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
‘दाम दुप्पट’ आमिषाने 5 कोटींची फसवणूक
तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली. चिंतामणी याने पिंपरी-चिंचवड परिसरातील 40 हून अधिक नागरिकांना “पैसे दुप्पट करून देतो” असे आमिष दाखवून जवळपास 5 कोटी रुपये हातोहात लाटले. या पैशाची रक्कम त्याने स्वतःच्या मेहुण्याच्या खात्यात वळती केल्याचेही निष्पन्न झाले आहे. अनेक पीडितांनी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या असून, चिंतामणीचा गैरव्यवहाराचा फुगलेला फुगा अखेर फुटला आहे.
आयुक्तांचा निर्णय : “सेवेत ठेवणे अयोग्य”
पदाचा, अधिकाराचा आणि सार्वजनिक विश्वासाचा निर्लज्जपणे गैरवापर करणाऱ्या चिंतामणी याच्याविरोधातील पुरावे इतके ठोस होते की, त्याला शासकीय सेवेत ठेवणे अशक्य झाल्याचे आयुक्त चौबे यांनी स्पष्ट केले. अखेरीस त्याची शासकीय सेवेतून हकालपट्टी करण्यात आली असून या निर्णयामुळे दलातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही मोठा दणका बसला आहे.