पुणे: महसूल विभागावर सरकारचा वॉच – आता तरी शहाणे होणार का अधिकारी?

n691955532176500197681288a6ac09bf4149cfae7a289c6f0c4fb502df1e7a4f9585a00f572bed6896117b.jpg

पुणे – महसूल विभागातील वाढत्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर अखेर शासन झोपेतून जागे झाले असून अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सात दक्षता पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे तक्रारींचा ढीग वाढत असताना आता हा “निगराणी मोड” सुरू झाला असला, तरी उशिरा का होईना, योग्य दिशेने पाऊल टाकले गेले, असे म्हणावे लागेल.

महसूल विभागातील जमीन मोजणी, गौण खनिज, मुद्रांक शुल्क अशा संवेदनशील कामकाजात अनियमितता ही नवीन बाब राहिलेली नाही. मात्र तक्रारींना दुर्लक्ष, चौकशीची टांगती तलवार आणि काहींची मनमानी — या सर्वांचा कंटाळा आला म्हणूनच सरकारला उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची वेळ आली, असेच दिसते.

आता ‘चार अधिकाऱ्यांशिवाय’ चौकशी नाही!
अनेक वर्षे ‘एकट्याने तपास करून काय हाती येते?’ अशी जनतेची भावना होती. शासनाने अखेर ती दुरुस्त करत तपासणीवेळी पथकातील किमान चार अधिकारी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. म्हणजे पुढे जाऊन एखाद्याला मर्जीची रिपोर्ट बनवण्याची सोय कमी होणार… किमान कागदोपत्रीत तरी!

दक्षता पथकाला सुद्धा वॉच
३० दिवसांत प्राथमिक अहवाल अनिवार्य आणि तक्रार गंभीर असेल तर थेट १५ दिवसांची मुदत — हे सांगितल्यावर तरी तपास गतिमान होताना दिसेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कागदपत्रे वेळेत न देणाऱ्या कार्यालय प्रमुखावर शिस्तभंगाची कारवाई… ही तर खरोखरच गेम चेंजर ठरू शकते. पण ही कारवाई प्रत्यक्षात होताना पाहायला जनता आतुर आहे.

समितीची मांडणी भारी, पण परिणाम?
या समितीत अपर आयुक्त, उपजिल्हाधिकारी, भूमिअभिलेख अधिकारी, खनिकर्म अधिकारी, निबंधक, तहसीलदार अशा बड्यांची फौज आहे. समिती भव्य आहे… आता कामही तितकेच भव्य होणार का, हा खरा प्रश्न.

सरकारचा इशारा : तथ्य आढळले, तर कारवाई ठोकली जाईल
तथ्य सापडल्यास दोषींवर १९७९ च्या नियमांनुसार कारवाई — हे विधान नक्कीच कडक आहे. पण जनतेचा विश्वास परत मिळवायचा असेल तर या ‘कडक शब्दां’सोबत ‘कडक कृती’ही तितकीच आवश्यक आहे.


महसूल विभागावर वॉच ठेवण्याचे सरकारचे हे पाऊल स्वागतार्ह आहे. पण ज्या विभागावर सर्वसामान्य नागरिकाची रोजची कामे अवलंबून असतात, त्या विभागात बदल फक्त आदेशांनी होत नाहीत. त्यासाठी इच्छाशक्ती, पारदर्शकता, आणि सर्वात महत्त्वाचे — प्रत्यक्ष कारवाई आवश्यक आहे. आता पहावे लागेल की हा वॉच म्हणजे फक्त कागदी वॉच की प्रत्यक्ष परिणाम करणारा गजर!

Spread the love

You may have missed