पुणे: भोर तहसील कार्यालयातील महिला मंडळ अधिकारी १ लाखांची लाच घेताना ACBच्या सापळ्यात अटक
पुणे : भोर तालुक्यातील तहसील कार्यालयातील महिला मंडळ अधिकारी रुपाली अरुण गायकवाड (वय ४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. माती वाहतुकीच्या परवान्यासंदर्भात ‘सहकार्य’ करण्याच्या नावाखाली त्यांनी तक्रारदाराकडे १ लाख ५० हजारांची लाच मागितल्याची माहिती ACBकडून देण्यात आली.
तक्रारदार यांनी १९ नोव्हेंबर २०२५ ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी २०० ब्रास माती वाहतुकीचा परवाना भोर तहसील कार्यालयातून नियमांनुसार घेतला होता. यासाठी त्यांनी एक लाख २६ हजार २३० रुपयांची रॉयल्टीही शासनाकडे भरली होती. मात्र, ३० नोव्हेंबर रोजी मंडळ अधिकारी रुपाली गायकवाड यांनी माती वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून ठेवले आणि गाड्या सुरू करण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास माती वाहतूक बंद ठेवण्याची धमकी देखील त्यांनी तक्रारदाराला दिली.
तक्रारदाराने ही बाब ACBकडे कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. भोर शहरालगतच्या अभिजित मंगल कार्यालय परिसरात तक्रारदार आणि आरोपी अधिकाऱ्याची भेट निश्चित करण्यात आली. या ठिकाणी रुपाली गायकवाड यांनी मागितलेल्या रकमेपैकी १ लाख रुपये स्वीकारताच ACB पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.