महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी आबेदा इनामदार यांची एकमताने निवड
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (कॅम्प, पुणे)च्या अध्यक्षपदी श्रीमती आबेदा पी. इनामदार यांची एकमताने निवड करण्यात आली. बुधवार, ३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित सोसायटीच्या विशेष बैठकीत गव्हर्निंग बोर्डाच्या सदस्यांनी हा ठराव मंजूर केला.
सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी झाले असून नव्या कार्यकारिणीत मुझफ्फर शेख यांची उपाध्यक्ष, इरफान शेख यांची सचिव, इफ्तेकार पी. इनामदार यांची सहसचिव, तर हाजी अब्दुल कदीर कुरेशी यांची खजिनदार पदावर निवड झाली आहे.
श्रीमती आबेदा इनामदार यांचे अनुभवी नेतृत्व, शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव, दूरदृष्टी आणि सोसायटीच्या मूल्यांप्रती असलेली निष्ठा याबद्दल बैठकीत विशेष प्रशंसा व्यक्त करण्यात आली. शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आणि समाजउन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचेही गव्हर्निंग बोर्डामध्ये नमूद करण्यात आले.
त्यान्च्या नेतृत्वाखाली सोसायटी नवे शैक्षणिक क्षितिज गाठेल, प्रगतीच्या नव्या टप्प्यांकडे वाटचाल करेल, असा विश्वास उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला. सोसायटीच्या कारभारात सकारात्मक बदल आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा यावेळी मांडण्यात आली.