पुणे : आयुष्यमान भारतअंतर्गत पाच लाखांपर्यंत विमा, खाजगी रुग्णालयाचाही समावेश, वाचा सविस्तर

1

पुणे: केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना एकत्र करून ‘आयुष्यमान भारत योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. नागरिकांनी योजनेचे कार्ड घेण्याचे आवाहन आयुष्यमान भारत मिशनचे राज्य प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी शुक्रवारी केले.

या योजनेत १३५६ आजारांवर मोफत उपचार उपलब्ध आहेत, तसेच पांढरे, केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डधारकांचा देखील या योजनेत समावेश आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या आढावा बैठकीत शेटे यांच्या अध्यक्षतेखाली ही माहिती देण्यात आली. ते म्हणाले, “पूर्वी राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारची पंतप्रधान आरोग्य विमा योजना एकत्र करून ही योजना राबवण्यात आली आहे. आता लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कव्हरेज मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात ६८ रुग्णालयांमध्ये ही योजना लागू आहे, त्यात १२ खासगी रुग्णालयांचादेखील समावेश आहे. लवकरच आणखी काही रुग्णालयांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे.”

रुग्णालयांकडून आयुष्यमान भारत कार्डला प्रतिसाद दिला जात नसल्याबाबत डॉ. शेटे म्हणाले, “पूर्वी ही समस्या होती, पण आता परिस्थिती बदलली आहे. सरकारने रुग्णालयांसाठी निश्‍चित केलेले दर कमी असल्यामुळे हे प्रकार घडत होते. आता त्या दरात २० ते २५ टक्के वाढ केली आहे.”

लाभार्थ्यांची संख्या वाढणार…
नव्या योजनेमुळे पिवळ्या, पांढऱ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या योजनेत पुणे जिल्ह्यात ३८ लाख लाभार्थ्यांची संख्या होती, जी आता ६३ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेत एक लाख रुपयांपर्यंत अपघात विमा संरक्षण मिळते, आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कमी करून प्रक्रिया सोपी केली आहे.

‘आयुष्यमान’चे स्वतंत्र कक्ष…
ज्या रुग्णालयात ही योजना लागू आहे, तिथे आयुष्यमान भारत योजनेचे स्वतंत्र कक्ष आहेत. नागरिकांनी त्या ठिकाणी भेट देऊन कोणत्या आजारांवर मोफत उपचार मिळू शकतात याची माहिती घ्यावी. रुग्णालयाने उपचार नाकारल्यास तक्रार करावी, असे डॉ. शेटे यांनी सांगितले.

Spread the love

1 thought on “पुणे : आयुष्यमान भारतअंतर्गत पाच लाखांपर्यंत विमा, खाजगी रुग्णालयाचाही समावेश, वाचा सविस्तर

  1. आयुष्मान कार्ड का कोई फायदा नहीं है प्राइवेट हॉस्पिटल में इस कार्ड को देखा भी नहीं जाता है प्राइवेट हॉस्पिटल में कहा जाता है इस कार्ड पर कहां लिखा है इस कार्ड का कोई मतलब नहीं है हमने खुद ने इसका अनुभव लिया है प्राइवेट हॉस्पिटल वाले कहते हैं यह सरकारी कार्ड है इसे सरकारी अस्पतालों में बताओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed