पत्रकारांचा सणासुदीतही पाठिंब्यासाठी आक्रोश : जाहिरात मागितली की लोक फिरवतात पाठ
पुणे: “जाहिरात मागितली की लोक पाठ फिरवतात!” हे पुणे येथील पत्रकारांचे एक ज्वलंत वास्तव आहे. लोकप्रतिनिधी असो वा मोठा व्यावसायिक, पत्रकार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी दिवसरात्र कार्यरत असताना, जेव्हा त्यांना थोडं आर्थिक बळ देण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र सर्वजण दुरावतात, अशी खंत व्यक्त होत आहे.
पत्रकार : वर्षातून एकदाच अपेक्षा
पत्रकार दररोज कुणाकडे मागत नाही. वर्षातून केवळ एकदातरी आपल्या भागातील जाहिरात वृत्तपत्राला देऊन पत्रकाराचे मनोबल वाढवावे, एवढीच माफक अपेक्षा असते. परंतु, सणासुदीच्या काळातही अनेक लोकप्रतिनिधी व व्यावसायिक जाहिरात देण्यापासून दूर राहतात. इतकेच नव्हे तर काहीजण तर फोनसुद्धा उचलत नाहीत, अशी व्यथा अनेक पत्रकार बोलून दाखवत आहेत.
संकटकाळी मात्र पत्रकारांची आठवण!
दुसरीकडे, जेव्हा काही घटना घडते, अन्याय होतो किंवा कुणाला न्याय मिळत नाही, तेव्हा मात्र सर्वांनाच पत्रकारांची आठवण येते.
* पोलीस स्टेशनमध्ये न्याय न मिळाल्यास पत्रकार आठवतो.
* समाजापर्यंत भावना पोहोचवायच्या असतील तर पत्रकार आठवतो.
* सरकारपर्यंत प्रश्न पोहोचवायचा असेल तरी पत्रकार आठवतो!
निवडणुका आल्या की पत्रकार परिषद, मोठे संकट आले की पत्रकार परिषद, परंतु जेव्हा पत्रकाराला थोडीशी मदत हवी असते, तेव्हा मात्र सगळे मौन बाळगतात, हे दुटप्पी चित्र वारंवार दिसत आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ, पण आर्थिक आधार नाही!
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकाराचे कार्य सर्वमान्य असले तरी, प्रत्येक पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतो, हे वास्तव नाकारता येत नाही. समाजातील अन्यायाविरुद्ध लढताना किंवा सत्य मांडताना पत्रकाराकडे आर्थिक आधार असणे आवश्यक आहे. हा आधार स्थानिक समाजाकडून जाहिरातीच्या स्वरूपात किंवा नैतिक पाठबळाच्या रूपात मिळणे अपेक्षित आहे.
जाहिरात देणं बंधनकारक नाही; पण मग संकटकाळी पत्रकारांकडे मदतीची अपेक्षा ठेवणंही योग्य नाही, असे परखड मत पत्रकारांनी व्यक्त केले.
कर्तव्य थांबणार नाही!
“आर्थिक मदत नाही मिळाली तरी हरकत नाही, पण पाठिंबा मात्र असू द्या,” अशी भूमिका पत्रकारांनी घेतली आहे. पत्रकार समाजातील प्रत्येक घटकासाठी झटतो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो आणि दुर्लक्षित जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवतो. एक छोटी जाहिरात किंवा सहाय्य मिळाल्यास पत्रकाराला प्रोत्साहन मिळेल आणि तो समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करू शकेल. “जाहिरात नाही दिली म्हणून आमचं कर्तव्य थांबणार नाही. गावापासून राज्यापर्यंत – माहिती, सत्य आणि न्यायासाठी आम्ही सदैव झटत आलो आणि झटत राहू,” या शब्दांत पत्रकारांनी आपले कार्य निष्ठेने करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.