पुणे: दिवाळीत पुण्यात ६८ ठिकाणी लागली आग; सुदैवाने जीवितहानी नाही; वाचा सविस्तर
पुणे, २४ ऑक्टोबर : दिवाळीच्या उत्सवात फटाक्यांच्या ठिणग्यांनी आनंदासोबतच धोक्याची ठिणगीही पेटवली. शहरात गेल्या चार दिवसांत विविध भागांत एकूण ६८ ठिकाणी आगीच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.
फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे गवत, कचरा आणि अडगळ पेटली
नरक चतुर्दशीपासून ते भाऊबीजेपर्यंत दिवाळीचा जल्लोष सुरू होता. विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळनंतर तब्बल ४२ ठिकाणी आग लागल्या. बहुतांश आगी किरकोळ स्वरूपाच्या होत्या आणि त्या गवत, झुडपे, सोसायटी परिसरातील कचरा किंवा मोकळ्या जागेत पडलेल्या अडगळीत पेटल्याचे आढळले.
काही ठिकाणी फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे गॅलरीतील पडदे, वाहनांवरील प्लास्टिक कव्हर आणि ठेवलेली अडगळ पेटल्याच्या घटना घडल्या. फुरसुंगी, खराडी, कोरेगाव पार्क, भवानी पेठ, नाना पेठ, टिंगरेनगर, बाणेर, मार्केटयार्ड, कात्रज, धानोरी, येरवडा आणि हडपसर या भागांत आगीच्या घटना नोंदल्या गेल्या.
अग्निशमन दलाची तात्काळ धाव
हडपसरमधील फुरसुंगी परिसरात एका उंच इमारतीच्या दहाव्या मजल्यावर फटाका जाऊन पडल्याने गॅलरीतील पडद्याला आग लागली. अग्निशमन दलाने काही मिनिटांतच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. खराडीतील गेरा सोसायटी परिसरातही तत्सम घटना घडली, तर हडपसर लोहमार्गाजवळ गवताला लागलेली आगही वेळेत विझवण्यात आली.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दलातील अधिकारी आणि जवानांनी केलेल्या वेगवान आणि तत्पर कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला.
अग्निशमन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवा आणि मोकळ्या जागांमध्ये किंवा अडगळीत फटाके वाजवू नका, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील.