जोवर अन्नात भेसळ आहे, तोवर आरोग्याची दिवाळखोरी — दिवाळीच्या गोडधोडामागचं कडू सत्य; दिवाळीत खवा, तूप, साखर, तेलात भेसळीचा सुळसुळाट; एफडीएची निष्क्रियता पुन्हा चर्चेत

0
pudhari_import_wp-content_uploads_2023_12_17-13.jpg

पुणे प्रतिनिधी: दिवाळी म्हटलं की गोडधोडाचा सण, पण यावर्षीही गोडीपेक्षा भेसळीची कडू चवच जिभेवर राहणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण दिवाळी हा काळ भेसळखोरांसाठी ‘सुवर्णकाळ’ ठरतो. बाजारात खवा, तूप, साखर, तेल, मिठाई यांत फॉर्मालिन, डिटर्जंट, सिंथेटिक कलर आणि स्टार्च यांसारख्या घातक रसायनांचा वापर वाढतोय. तरीही अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मात्र नेहमीप्रमाणे झोपेतच असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

उत्सवकाळात गोड पदार्थांची मागणी झपाट्याने वाढते. त्या मागणीची पूर्तता करताना अनेक ठिकाणी कच्चा माल कमी पडतो आणि त्यावर उपाय म्हणून भेसळयुक्त पदार्थ बाजारात येतात. खवा आणि तूपात मिसळ, मिठाईत कृत्रिम रंग आणि गंधकयुक्त साखर वापरली जाते. परिणामी ग्राहकांच्या ताटात पोहोचतं ते आकर्षक पण घातक अन्न.

दरवर्षी एफडीए अधिकारी काही किलो भेसळयुक्त खवा, तेल किंवा मिठाई जप्त करून कारवाई केल्याची बातमी समोर येते. मात्र दिवाळी संपली की या कारवाया आणि चर्चाही विस्मृतीत जातात. “आपल्या भागातील अन्न निरीक्षक कोण आहे?” हा प्रश्न विचारला तर बहुतांश नागरिकांना उत्तरच देता येत नाही. पोलिस स्टेशन माहीत असतं, पण अन्नसुरक्षा कार्यालय मात्र नाही!

२०११ पासून लागू असलेला ‘अन्नसुरक्षा व मानके अधिनियम’ हा कायदा देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी आहे. या कायद्यानुसार शेतीपासून ताटापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर अन्नाची तपासणी अपेक्षित आहे. मात्र वास्तवात ही यंत्रणा कागदावरच सक्रिय आहे.

अन्नव्यवसाय आज एक उद्योग झाला आहे. मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्यासाठी काही व्यावसायिक अन्नाची गुणवत्ता तिलांजली देतात. अर्थकारणातली ही भेसळ आता इतकी मजबूत झाली आहे की प्रशासनालाही ती आवरणं कठीण झालं आहे.

राज्यभर अन्न सुरक्षा आयुक्त, प्रयोगशाळा आणि निरीक्षकांची यंत्रणा असूनही भेसळ कमी झालेली नाही. उलट, काही निरीक्षकांवर लाचखोरीचे आरोप झाले आहेत. २०१८ मध्ये पुण्यात एका निरीक्षकाने सहा महिन्यांसाठी नऊ लाखांचा ‘हप्ता’ मागितल्याची घटना चर्चेत आली होती.

तज्ज्ञांच्या मते, “अन्नभेसळ ही केवळ कायदेशीर समस्या नाही, तर ती मानवी अध:पतनाची खूण आहे.” कायदे, निधी आणि अधिकारी असतानाही जर जनता उदासीन आणि प्रशासन निष्क्रिय राहिले, तर प्रत्येक दिवाळी गोड नव्हे तर घातकच ठरेल.

Spread the love

Leave a Reply

You may have missed