जुगाराचा नवा फंडा! फायटर कोंबड्यांची झुंज लावून पैशांचा खेळ, सहा जणांना अटक
वानवडी पोलिसांची इम्प्रेस गार्डन परिसरात कारवाई; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
Wanawadi-police-station.jpg

पुणे प्रतिनिधी: पैशाच्या मोहात माणूस किती खाली जाऊ शकतो, याचं धक्कादायक उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं आहे. शहरातील काही तरुणांनी फायटर कोंबड्यांची झुंज लावून त्यावर पैशांची बाजी लावण्याचा नवा ‘जुगार फंडा’ सुरू केला होता. मात्र, वानवडी पोलिसांनी वेळेवर छापा टाकत या अमानुष आणि अवैध कृत्याला आळा घातला. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून ५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वानवडी पोलिस ठाण्याच्या पथकाकडून १९ ऑक्टोबर रोजी हद्दीतील इम्प्रेस गार्डन परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की, काही इसम मोकळ्या मैदानात कोंबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळत आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन टिम तयार केल्या आणि छापा टाकला.

छाप्यात पोलिसांनी अमोल सदाशिव खुर्द, मंगेश आप्पा चव्हाण, निखिल मनिष त्रिभुवन, अमिर आयुब खान, सचिन सदाशिव कांबळे आणि प्रणेश गणेश पॅरम या सहा जणांना रंगेहात पकडलं. चौकशीत त्यांनी फायटर कोंबड्यांच्या झुंजींवर पैज लावल्याची कबुली दिली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ६ रंगीबेरंगी फायटर कोंबडे, ६ पिशव्या, ३ मोटारसायकली, ५ मोबाईल फोन आणि २,५८५ रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ११ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. अधिकारी सांगतात की, पशु क्रूरता आणि जुगारविरोधी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पोलिसांचे आवाहन: नागरिकांनी अशा अवैध कृत्यांची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, जेणेकरून समाजात अशा क्रूर आणि बेकायदेशीर खेळांना आळा बसू शकेल.

Spread the love

Leave a Reply

You may have missed