पुण्यातील मॉडर्न कॉलेजमुळे तरुणाची ब्रिटनमधील नोकरी गमावली? प्रेम बिऱ्हाडेचा गंभीर आरोप; कॉलेजचे फेटाळले स्पष्टीकरण – व्हिडिओ

पुणे, प्रतिनिधी: पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कॉलेजकडून शैक्षणिक कागदपत्रांच्या पडताळणीस विलंब झाल्याने आपली ब्रिटनमधील नोकरी गेल्याचा धक्कादायक दावा प्रेम बिऱ्हाडे या तरुणाने केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे प्रेमने संपूर्ण प्रकरण सांगत महाविद्यालय प्रशासनावर जातीय भेदभावाचे गंभीर आरोप केले आहेत.
पहा व्हिडिओ
प्रेम बिऱ्हाडेने २०२० ते २०२४ या कालावधीत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेजमध्ये बीबीए पदवी पूर्ण केली. प्रेमच्या ब्रिटनमधील कंपनीने कॉलेजकडे ई-मेलद्वारे शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी मागितली होती. मात्र, कॉलेजकडून प्रतिसाद न आल्याने त्याची नोकरी गमावली गेल्याचा दावा प्रेमने केला. त्याने सांगितले की, स्वतः विभागप्रमुख, उपप्राचार्य आणि प्राचार्यांशी संपर्क करूनही पडताळणी केली गेली नाही. “माझ्या जातीबाबत विचारणा करून प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यात आला,” असा धक्कादायक आरोपही त्याने केला.
प्रेमने आपल्या व्हिडिओमध्ये भावनिकपणे म्हटले, “माझ्या हातात कंपनीचं आयडी कार्ड आहे. मी ते परत करतोय, कारण माझी नोकरी गेली आहे — ती पण माझ्या पुण्यातील कॉलेजमुळे. ज्यांनी मला युनिव्हर्सिटीच्या अॅडमिशनवेळी शिफारसपत्र दिलं, त्याच कॉलेजने आता मला विद्यार्थी म्हणून नाकारलं. हे फक्त नोकरी नाही, हा माझ्या कुटुंबाचा आणि समाजाचा संघर्ष आहे.”
दरम्यान, मॉडर्न कॉलेज प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी सांगितले की, “१४ ऑक्टोबर रोजीच विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले गेले आहे. प्रेम बिऱ्हाडे सोशल मीडियाचा गैरवापर करून महाविद्यालयाची बदनामी करत आहे. त्याची कृती सायबर छळ आणि समाजात तणाव निर्माण करणारी आहे. आवश्यक असल्यास पोलिसांकडे कायदेशीर कारवाई केली जाईल.”
या प्रकरणात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) कडून हस्तक्षेप करण्यात आला आहे. पक्षाध्यक्ष सचिन खरात यांनी प्रेम बिऱ्हाडेशी भेट घेतल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर चर्चेत असून, विद्यार्थ्यांमध्ये “महाविद्यालयीन प्रशासन कितपत जबाबदार?” या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.