पुणे: कोंढव्यात भ्रष्टाचाराचा ‘तडका’; लाचखोर पोलीस शिपाई आणि निवृत्त अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

0
police-constable.jpg

पुणे : ‘जनतेचे रक्षण करायचे की पैशांचे?’ – हा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाने नागरिकांकडून लाच मागितल्याने संपूर्ण पोलीस दलाची प्रतिष्ठा पुन्हा एकदा कलंकित झाली आहे. अँटी करप्शन ब्युरोने (ACB) या शिपायाला आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्याला रंगेहात पकडून भ्रष्टाचाराविरोधातील आपला ‘हल्ला बोल’ कायम ठेवला आहे.

वीज चोरीच्या गुन्ह्यात ‘मदत’ करण्यासाठी आणि अटक न करण्याच्या बदल्यात तब्बल १० हजार रुपयांची मागणी — म्हणजेच कायदा राखणाऱ्यानेच कायद्याची बोळवण! तक्रारदाराने धाडस दाखवून एसीबीकडे धाव घेतली, आणि शेवटी ५ हजार रुपयांवर तडजोड ठरली. पण ‘तडजोड’ ठरलीच भ्रष्ट शिपायाच्या करिअरशी — कारण एसीबीच्या सापळ्यात तो पैसे स्वीकारताना पकडला गेला.

आरोपी शिपाई सोमनाथ बापू महारनवर (वय ३४) याला ‘प्रेरणा’ दिली ती कुणी साधा माणूस नव्हे तर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक युवराज फरांदे यांनी. निवृत्तीनंतरही भ्रष्टाचाराची ‘सेवा’ सुरूच ठेवणाऱ्या या माजी अधिकाऱ्यामुळे पोलीस विभागाच्या प्रतिमेवर डाग पडला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त निता मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस निरीक्षक असावरी शेडगे यांच्या पथकाने अचूक नियोजन करून केली. या ‘स्वच्छ कारवाई’साठी अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांनी मार्गदर्शन केले.

लाचखोरांचा सुळसुळाट थांबावा म्हणून एसीबीने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे —
“लाच देऊ नका, तक्रार करा!”
📞 020-26122134 / 26132802 / 9403781064
📱 WhatsApp : 9403781064
🌐 www.acbmaharashtra.gov.in

जनतेच्या मनातला प्रश्न मात्र कायम आहे —
लाचखोरीचा ‘करंट’ कधी जाणार, आणि कायद्याच्या रक्षकांना प्रामाणिकतेचा ‘शॉक’ कधी बसणार?

Spread the love

Leave a Reply