पुणे: कमला नेहरू रुग्णालयात बाल अतिदक्षता विभागासाठी डॉक्टरांचा तुटवडा; स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांची ऑडिटची मागणी

पुणे : नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कमला नेहरू रुग्णालयात आधुनिक बाल अतिदक्षता विभाग (पेडियाट्रिक आयसीयू) उभारला आहे. मात्र, या विभागासाठी आवश्यक डॉक्टरच उपलब्ध नसल्याचे समोर आल्यानंतर आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी या विभागातील डॉक्टरांची उपस्थिती आणि साधनसामग्रीची तातडीने सेवा तपासणी (ऑडिट) करण्याची मागणी केली आहे.
ससून रुग्णालयाच्या बालरोग विभागप्रमुखांनी महापालिकेला पत्र लिहून “महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डॉक्टर नोकरीसाठी उपलब्ध नाहीत,” असा खुलासा केला आहे. परंतु या दाव्याला कदम यांनी हास्यास्पद आणि दिशाभूल करणारा ठरवले आहे. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी शेकडो डॉक्टर पदवीधर होतात. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता हा मुद्दा स्वीकारार्ह नाही.”
महापालिकेच्या आरोग्य विभागाने या तक्रारीकडे गांभीर्याने पाहत डॉक्टरांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशीही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला अत्याधुनिक आयसीयू डॉक्टरांशिवाय अर्धवट अवस्थेतच पडून असल्याने महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
—