माहिममध्ये लाउडस्पीकरवरून अजान दिल्याने पोलिसांची कारवाई; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील माहिम येथील वानजेवाडी भागात असलेल्या एका मशिदीत लाउडस्पीकरवरून अजान दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मशिदीचे विश्वस्त शहनवाज खान आणि अजान देणारे मुअज्जिन या दोघांविरुद्ध मुंबई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 223 (लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
एका पोलीस कॉन्स्टेबलला मशिदीतून लाउडस्पीकरवर अजान दिल्याचा व्हिडिओ प्राप्त झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता मुअज्जिनकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यापूर्वी जानेवारी महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील पोलिसांना ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लाउडस्पीकरविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, कोणत्याही धर्मात लाउडस्पीकरचा वापर हा धार्मिक अनिवार्यता मानला जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर माहिम पोलिसांनी संबंधित मशिदीतील घटनेवर कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.