येरवडा: राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये नागरिकांच्या तक्रारींवर अनवर पठाण यांची धडक भेट; मूलभूत सुविधा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा – व्हिडिओ

पुणे – येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर सामाजिक कार्यकर्ते मा. अनवर महेमूद पठाण यांनी शनिवारी अचानक भेट देत आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार, हॉस्पिटलमधील केस पेपर काउंटर वेळेच्या आधी बंद केले जातात, डॉक्टर वेळेवर हजर नसतात तसेच दुपारच्या जेवणाच्या सुटीनंतर दीड तास उशिराने ओपीडी पुन्हा सुरू होते. इतकेच नव्हे तर सायंकाळी चार वाजताच केस पेपर बंद केले जातात, अशी माहिती उपस्थित नागरिकांनी पठाण यांना दिली.
पहा व्हिडिओ
यावेळी नागरिकांनी आणखी गंभीर बाब समोर मांडली की, इतक्या मोठ्या दवाखान्यात आयसीयू वार्डच नाही तसेच गरोदर महिलांचे सिझेरियन ऑपरेशनही येथे होत नाही. रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास त्यांना थेट ससून रुग्णालयात पाठवले जाते.
या तक्रारी ऐकल्यानंतर अनवर पठाण यांनी सहकारी कादिरभाई शेख यांच्यासह वरिष्ठ डॉक्टर बागडे यांची भेट घेतली आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांना दूरध्वनीवर संपर्क साधून नागरिकांच्या समस्या मांडल्या.
“डॉक्टर वेळेवर उपस्थित नसणे व नागरिकांना सुविधा न मिळणे ही गंभीर बाब आहे. संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच लवकरात लवकर आयसीयू सुरू करून सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा नागरिकांच्या हक्कांसाठी आंदोलन छेडावे लागेल,” असा इशारा पठाण यांनी दिला.
आता या प्रकरणात डॉ. नीना बोराडे कोणती कारवाई करतात, याकडे येरवडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.