पुणे: लाचखोरीला आळा घालण्यासाठी ‘अँटी करप्शन’ आपल्या दारी! १३ ते १६ ऑक्टोबरदरम्यान पुणे जिल्ह्यात जनजागृती मोहीम; नागरिकांना घरबसल्या तक्रारी करण्याची सुविधा

पुणे – शासन कार्यालयात कामासाठी गेले की अधिकारी किंवा मध्यस्थ लाचेची मागणी करतात, अशी तक्रार अनेकदा नागरिकांकडून येते. मात्र, आता अशा भ्रष्ट प्रवृत्तींवर अंकुश आणण्यासाठी अँटी करप्शन ब्युरो (ACB) स्वतः नागरिकांच्या दारी येत आहे. १३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुणे जिल्हाभर ‘अँटी करप्शन तुमच्या दारी’ ही विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.
या मोहिमेचा उद्देश नागरिकांमध्ये लाचलुचपत विरोधी कायद्याबाबत जनजागृती करणे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध त्वरित तक्रार नोंदविण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. या कालावधीत एसीबीचे अधिकारी आपल्या पथकासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या शासकीय विश्रांतीगृहात उपस्थित राहणार आहेत.
या ठिकाणी अधिकारी परिसरातील समाजसेवक, अशासकीय संस्थांचे पदाधिकारी तसेच एसीबीकडे यापूर्वी तक्रार केलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी आणि अडचणी ऐकून घेतील. यावेळी नागरिकांना जागेवरच तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तक्रारी त्वरित स्वीकारल्या जाणार
अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, कोणताही लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी एजंट शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागत असल्यास, नागरिकांनी विलंब न करता एसीबीच्या अधिकाऱ्यांना तक्रार द्यावी. तक्रार जागेवरच स्वीकारली जाईल आणि संबंधितांविरुद्ध तातडीने कारवाई सुरू केली जाईल.
भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा संकल्प
पुणे जिल्हा अँटी करप्शन ब्युरोकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,
“भ्रष्टाचारविरुद्ध लढा देण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. तुमची ओळख गोपनीय ठेवली जाईल. प्रामाणिक नागरिकांनी मिळूनच पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन उभारता येईल.”
या मोहिमेमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून, शासनाच्या दारात प्रामाणिकपणाचा आवाज अधिक बुलंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.