पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट झोपली, जाहिरातदार मोकळे –  जॉकीच्या जाहिरातीवर महिलांचा जोरदार आंदोलन – व्हिडिओ व्हायरल

0
IMG_20251008_211311.jpg

पुणे : शहरातील शंकरशेठ रोडवरील पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात लावण्यात आलेल्या एका होर्डिंगवरून संतापाचा स्फोट झाला आहे. हुंडाई कंपनीच्या जागेवर लावण्यात आलेल्या जॉकी या अंतर्वस्त्र कंपनीच्या जाहिरातीवर अश्लीलता आणि महिलांच्या मनात लज्जा निर्माण करणारा मजकूर असल्याचा आरोप करत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जोरदार आंदोलन छेडले.

पहा व्हिडिओ

महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सगाई ताई आणि महिला आघाडी अध्यक्षा डेझी डेव्हिड मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी “एरिया तुमचा, धमाका आमचा!” अशा घोषणा देत पॅंथर स्टाईलमध्ये आपला निषेध नोंदवला. कार्यकर्त्यांनी जाहिरातीवरील पोस्टरला काळा फास लावत कंपनीविरोधात संताप व्यक्त केला.

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, “शहरात सर्वत्र नैतिकतेचा बळी देऊन व्यावसायिक जाहिरातींचा सुळसुळाट सुरू आहे. महिलांचा अवमान करणारे फोटो लावून ब्रँड विकण्याची ही पद्धत लाजिरवाणी असून प्रशासन याकडे जाणूनबुजून डोळेझाक करत आहे.”

महिलांनी पुढे असेही आरोप केले की, “महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी जाहिरातदारांकडून कमिशन घेऊन अशा फलकांना परवानगी देतात. त्यामुळे शहराचे वातावरण बिघडत असून समाजामध्ये अश्लीलतेला चालना मिळत आहे.”

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. “जर अशी जाहिराती पुन्हा दिसल्या, तर आम्हीच त्या हटवू,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

पुणे पोलिस आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने या प्रकरणी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे — शहराच्या संस्कृतीला धक्का देणाऱ्या जाहिरातींना आळा घालायचा की त्यांच्यावर मौन बाळगायचं?

Spread the love

Leave a Reply