पुणे: वाघोलीतील श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षण विभाग घेणार स्वतःहून दखल

पुणे : वाघोली येथील श्री सरस्वती एज्युकेशनल ट्रस्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये एका शिक्षिकेने सातवीतील विद्यार्थ्याला मारहाण करून शाळेतून बाहेर काढल्याच्या धक्कादायक प्रकरणाची शिक्षण विभाग स्वतःहून दखल घेणार असल्याचे समोर आले आहे.
पालकांच्या तक्रारीनुसार, १२ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षिकेने वारंवार चापट मारल्याने त्याच्या कानाला दुखापत झाली आणि ऐकण्यास त्रास होत आहे. एवढेच नव्हे, तर प्रकरण दडपण्यासाठी शाळेने त्या मुलाला शाळेतूनच काढून टाकल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ही घटना १७ सप्टेंबर रोजी घडली असून, या प्रकरणी वाघोली पोलिसांनी शिक्षिका तृप्ती सक्सेना (वय ४३) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुलाच्या आईच्या मते, एका किरकोळ गैरसमजावरून शिक्षिकेने विद्यार्थ्याला अनेकदा चापट मारली. या घटनेनंतर मुलगा रडत, सुजलेले गाल व कानातील तीव्र वेदना घेऊन घरी आला. शारीरिक त्रासाबरोबरच या घटनेचा त्याच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम झाला आहे.
दरम्यान, ‘सीविक मिरर’ या दैनिकाने “पुण्यात अवतरली मोगलाई” या मथळ्याखाली हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाने तत्काळ हालचाल केली. या वृत्ताची दखल घेत, शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी सांगितले, “कोणतीही शाळा विद्यार्थ्याला मनमानी पद्धतीने काढून टाकू शकत नाही. आम्ही स्वतःहून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना तपासाचे निर्देश दिले आहेत.”
दुसरीकडे, शाळा प्रशासनाने स्वतःचे स्पष्टीकरण देताना सांगितले, “विद्यार्थ्याचे वर्तन आक्रमक होते. त्याच्या पालकांनाही या गोष्टीची जाणीव होती. मात्र, त्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल आम्हाला ठोस माहिती नाही. शाळेतील शिस्त सर्वांसाठी समान आहे.”
या घटनेमुळे खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांवरील शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या घटनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षण विभागाच्या चौकशीतून या प्रकरणाचा पुढील वेध लागणार आहे.