पुणे: दीनानाथ नंतर आता केईएम – पुण्यातील रुग्णालयं की ‘पैशांचे मॉल’? पैसा नाही तर उपचार नाही – हीच का आधुनिक आरोग्य व्यवस्था? मृतदेहावरही व्यवहार! आरोग्य विभाग झोपेतच का?

0
238637-download-17.webp

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वादग्रस्त घटनेला काही महिनेही लोटले नाहीत, तोच अगदी तसाच प्रकार आता पुण्यातील केईएम रुग्णालयात उघडकीस आला आहे. “रुग्णसेवेच्या नावाखाली पैशांची उकळी काढणे आणि मृतदेह देण्यासाठी बिल भरावेच लागेल” अशी खळबळजनक तक्रार जयेंद्र सोनी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

रुग्णालयात दाखल होताच ५० हजार रुपयांच्या सिक्युरिटी डिपॉझिटची मागणी – एवढंच काय, रुग्ण जीवाच्या आकांतात असताना फोनवरून पैशांसाठी दबाव! उपचारांनंतर काही दिवसांतच १० ते १५ लाख रुपयांचे बिल. मृत्यू झाल्यावरही उर्वरित थकबाकी भरल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार. एवढा व्यापारीपणा हा रुग्णालय चालवतंय की मॉल? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

मुलगी हीना सोनी यांनी स्पष्ट सांगितले की, “आमच्या वडिलांचे प्राण जात होते, तरी रुग्णालय प्रशासनाला पैशांचीच चिंता होती. माध्यमे पोहोचल्यावरच मृतदेह मिळाला.” हे विधान ऐकून सामान्य माणसाला हादरायला होतं.

तज्ज्ञ सांगतात – आपत्कालीन उपचारांसाठी आगाऊ पैसे घेणे, मृतदेह सोडण्यासाठी बिल पूर्ण भरावेच लागेल अशी अट घालणे हे स्पष्टपणे बेकायदेशीर आहे. मग प्रश्न असा –
👉 आरोग्य विभाग, नर्सिंग होम अॅक्ट, रुग्ण हक्क चार्टर हे सगळं फक्त कागदावर आहे का?
👉 दीनानाथनंतर आता केईएम – पुढचा क्रमांक कुणाचा?
👉 शासन, महापालिका, पोलिस यंत्रणा फक्त प्रेस नोट काढून मोकळी होते का?

सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून “मृतदेहही विकत घ्यावा लागतोय का?” असा रोखठोक सवाल केला जात आहे.

दरम्यान, केईएम प्रशासनाने आरोप फेटाळत स्वतःची बाजू मांडली. पण मृतदेह मिळवण्यासाठी माध्यमांची मदत लागावी, हेच वास्तव सगळं काही सांगून जातं.

आरोग्य क्षेत्रातील व्यापारीकरणाने आता शेवटची रेषाही ओलांडली आहे. रुग्णालय हे सेवागृह आहे की ‘कॅश काऊ’? हा प्रश्न केवळ पुण्याचाच नाही, तर संपूर्ण समाजाचा बनला आहे.


Spread the love

Leave a Reply