पुणे: सह्याद्री रुग्णालय प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी; समिती उद्या रुग्णालयात दाखल; १५ दिवसांत दोन मृत्यू, नातेवाइकांचा हलगर्जीपणाचा आरोप

पुणे : डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणी गठित करण्यात आलेली उच्चस्तरीय चौकशी समिती उद्या (ता.२५) प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल होऊन चौकशी करणार आहे.
१५ ऑगस्टला बापू कोमकर यांचा मृत्यू झाला होता, तर यकृत दान करणाऱ्या पत्नी कामिनी कोमकर यांचे २२ ऑगस्टला निधन झाले. या दुर्दैवी घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला होता. त्यानंतर राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशीस सुरुवात केली.
या समितीच्या अध्यक्षपदी चेन्नई येथील इंटरनॅशनल लिव्हर ट्रान्सप्लांट सोसायटीचे अध्यक्ष व यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मोहम्मद रेला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य सचिवपदी आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. भगवान पवार असून, समितीमध्ये डॉ. राम प्रभू, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. विजय व्होरा, डॉ. आकाश शुक्ला व डॉ. पद्मसेन रणबागले यांचा समावेश आहे.
या समितीची पहिली बैठक २९ ऑगस्ट रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली होती. त्यावेळी रुग्णालयाने सादर केलेले वैद्यकीय अहवाल तपासले गेले व पुढील चौकशीची रूपरेषा ठरविण्यात आली. आता समिती प्रत्यक्ष रुग्णालयाला भेट देऊन शस्त्रक्रियेचे अहवाल, उपचारांची प्रक्रिया आणि संबंधित कागदपत्रांची पाहणी करणार आहे.
तपास पूर्ण होईपर्यंत सह्याद्री रुग्णालयातील सर्व प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग व महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयाला नोटीस बजावली आहे.
“समिती प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी पूर्ण करेल. अहवाल या महिन्याच्या अखेरपर्यंत सरकारसमोर सादर करण्यात येईल,” असे डॉ. भगवान पवार यांनी स्पष्ट केले.
—