पुण्यात ५ नवीन पोलीस ठाणे आणि २ झोनला हिरवा कंदील

पुणे : शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन पुणे शहरात पाच नवीन पोलीस ठाण्यांसह दोन स्वतंत्र झोन (पोलीस उपायुक्त) स्थापन करण्यास राज्य सरकारच्या गृह व वित्त विभागाने सोमवारी (दि.१५ सप्टेंबर) मंजुरी दिली आहे. तसेच या ठाण्यांसाठी तब्बल ८३० नवीन मनुष्यबळालाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. ही माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
राज्यातील इतिहासात प्रथमच, केवळ एका वर्षात १२ नवीन पोलीस ठाणी व दोन झोन मंजूर झाल्यामुळे पुणे पोलीस आयुक्तालय आघाडीवर ठरले आहे. याआधी ऑक्टोबर २०१४ मध्ये सात पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली होती.
नव्या पोलीस ठाण्यांची ठिकाणे
लोहगाव (विमानतळ)
नऱ्हे
लक्ष्मीनगर (येरवडा)
मांजरी (हडपसर)
येवलेवाडी (कोंढवा)
याशिवाय दोन स्वतंत्र झोन (पोलिस उपायुक्त) कार्यरत होणार आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “गेल्या २० वर्षांत असा कोणताही प्रस्ताव शासनाकडे गेला नव्हता. लोकसंख्या आणि गुन्ह्यांचा वाढता प्रकार लक्षात घेऊन नवीन ठाण्यांची गरज भासत होती. या मंजुरीमुळे पोलिसांचे काम अधिक सक्षम व परिणामकारक होणार आहे.”
दरम्यान, नव्याने मंजूर झालेली ठाणी पुढील एका महिन्यात कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.
—