पुणे: सणासुदीला प्रवाशांची लूट – ग्राहक पंचायतीची सरकारकडे धाव

पुणे : सणासुदीच्या काळात एस.टी., रेल्वे यांसारख्या सार्वजनिक सेवांचे आरक्षण मिळणे कठीण होत असल्याने प्रवासी मोठ्या प्रमाणावर खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळतात. मात्र या संधीचा गैरफायदा घेत, खासगी बस चालक व टूरिस्ट टॅक्सीचालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असून प्रवाशांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
ग्राहक पंचायतीने नेमलेल्या समितीच्या अभ्यासातून हे वास्तव उघड झाले असून याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी पंचायतीकडून करण्यात आली आहे.
समितीच्या प्रमुख सूचना :
दर ठराविक करावेत : खासगी सेवांसाठी प्रति किलोमीटर दर परिवहन विभागाने अधिकृतरीत्या निश्चित करून देणे आवश्यक.
दरसूची लावणे अनिवार्य : वाहनांच्या कार्यालयात तसेच वाहनाच्या दर्शनी भागात अधिकृत दरसूची लावण्याचे निर्देश द्यावेत.
हमीनामा घेणे बंधनकारक : अवाजवी भाडे आकारले जाणार नाही, याची हमी खासगी सेवा देणाऱ्या आस्थापनांकडून लिखित स्वरूपात घेण्यात यावी.
ग्राहक पंचायतीने स्पष्ट केले आहे की, या उपाययोजना अंमलात आणल्यास प्रवाशांची फसवणूक रोखली जाऊन प्रवास अधिक पारदर्शक व सुरक्षित होईल. सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणीही करण्यात आली आहे.
—