सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ‘ID कार्ड’ बंधनकारक; नियमभंगावर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक नवा महत्त्वाचा नियम लागू केला आहे. शासकीय कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता वाढावी तसेच नागरिकांची गैरसोय टाळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
१० सप्टेंबर रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना आपले ओळखपत्र स्पष्टपणे गळ्यात घालणे बंधनकारक असणार आहे.
जर कर्मचारी किंवा अधिकारी यांनी ओळखपत्र न घातले, किंवा ते स्पष्टपणे दिसत नसल्यास त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे कार्यालयीन शिस्त वाढेल आणि नागरिकांना सरकारी कर्मचाऱ्यांची त्वरित ओळख पटेल, असा सरकारचा हेतू आहे.
यापूर्वीही कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्या नियमांचे पालन योग्यरीत्या न होत असल्याने सरकारला आता कडक भूमिका घ्यावी लागली आहे.
या नियमांचे पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुखांवर टाकण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या बेसिस्त कर्मचाऱ्यांवर आता कारवाई निश्चित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
—