महापालिकेची अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई: पथारी व्यावसायिकांना दिलासा नाही!; नगररोड, औंध-बाणेर, धनकवडीसह अनेक भागांत एकाचवेळी मोहीम

पुणे : महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापक मोहिमेला सुरुवात झाली आहे. दि. ९ सप्टेंबरपासून पुढील आदेश येईपर्यंत संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत १० सप्टेंबर रोजी विविध विभागांत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
नगररोड (वडगावशेरी), औंध-बाणेर, धनकवडी-सहकारनगर, हडपसर-मुंढवा आणि कसबा-विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सार्वजनिक रस्ते व पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणांवर ही मोहीम राबविण्यात आली.


ही कारवाई उपआयुक्त संदीप खलाटे यांच्या नियंत्रणाखाली झाली. यामध्ये संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त, बांधकाम विकास विभागातील कार्यकारी अभियंते, उपअभियंते, कनिष्ठ अभियंते, विभागीय अतिक्रमण अधिकारी, अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, बिगारी सेवक तसेच पोलिस व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
या मोहिमेत रस्तारुंदीत अडथळा ठरणारी फ्रंट मार्जिन व साइड मार्जिनवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात आली.
याशिवाय महापालिकेने दिलेल्या परवान्याच्या अटींचा भंग करणाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली. स्वतः व्यवसाय न करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागा वा व्यवसाय न पाळणे, सिलेंडरचा वापर करणे इत्यादी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधातही कार्यवाही करण्यात आली.
महापालिकेच्या या मोहिमेमुळे शहरातील रस्ते व पदपथ मोकळे होऊन वाहतुकीला दिलासा मिळणार आहे.