पुणे महापालिका क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकार वाढणार; नवे कार्यालये सुरू करण्याचीही तयारी

पुणे : महापालिकेच्या मुख्य विभागाकडून होणारी मोठी कामे – ड्रेनेज लाईन, रस्ते आदी कामांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी लवकरच क्षेत्रीय कार्यालयांकडे सोपवली जाणार आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच १५ क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त आणि विविध विभागप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत क्षेत्रीय कार्यालयांचे सक्षमीकरण, अधिकारवाढ, निधी वाढविणे आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे या बाबींवर सविस्तर चर्चा झाली.
नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी थेट महापालिकेच्या मुख्य इमारतीत पोहोचत आहेत. मर्यादित अधिकार आणि कमी निधीमुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून समस्या सुटत नसल्याची तक्रार वारंवार पुढे येत होती. त्यामुळे छोट्या-मोठ्या कामांसाठी मुख्य इमारतीत गर्दी होत असल्याचे चित्र दिसते. यावर उपाय म्हणून तातडीची कामे जलद गतीने होण्यासाठी निविदा प्रक्रियेत प्रतीक्षा यादी ठेवली जाणार आहे, जेणेकरून नवीन निविदा काढण्याचा विलंब टाळता येईल.
महापालिकेच्या हद्दीत नव्या गावांचा समावेश झाल्याने प्रभागांचे क्षेत्रफळ वाढले आहे. सध्याची क्षेत्रीय कार्यालये अपुरी पडत असल्याने नवीन कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यास कर्मचारीसंख्या आणि मनुष्यबळ वाढविण्यासाठीही भरती केली जाणार आहे.
“नागरिकांचे प्रश्न आणि विकासाची कामे तातडीने मार्गी लागावीत, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे,” असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी स्पष्ट केले.
थोडक्यात मुद्दे
ड्रेनेज, रस्ते आदी कामांची दुरुस्ती क्षेत्रीय कार्यालयांकडे
तातडीच्या कामांसाठी निविदा प्रक्रियेत प्रतीक्षा यादी ठेवली जाणार
क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसा निधी व मनुष्यबळ मिळणार
नवीन क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविणार
मान्यता मिळाल्यास नोकरभरतीची संधी निर्माण होणार
—