पुण्यात पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक; लष्कर व खडकी परिसरात वाहतूक बदल

पुणे : महंमद पैगंबर जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) सोमवारी (८ सप्टेंबर) पुण्यात लष्कर व खडकी परिसरात भव्य मिरवणुका निघणार असून यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
मुख्य मिरवणूक नाना पेठेतील मनुशा मशिद येथून सुरू होईल. ही मिरवणूक संत कबीर चौक, एडी कॅम्प चौक, भारत चित्रपटगृह, पद्मजी पोलीस चौकी, निशांत चित्रपटगृह, भगवानदास चाळ मार्गे पुढे जाईल. त्यानंतर चुडामन तालीम चौक, मुक्तीफौज चौक, कुरेशी मशीद, जान महंमद रस्ता, बाबाजान चौक, चारबावडी चौकातून मिरवणूक सरकत छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, भोपळे चौक, गांव कसाब मशीद, पूलगेट चौक मार्गे महात्मा गांधी रस्त्यावर येईल. महंमद रफी चौक, कोहिनूर चौक, महावीर चौक मार्गे जात ही मिरवणूक शुक्रवार पेठेतील सिटी जामा चौकात संपन्न होईल.
खडकी भागातही स्वतंत्र मिरवणूक निघणार आहे. ती आसुडखाना चौक, होले रस्ता, नवीन तालीम चौक, गोपी चौक, टांगा स्टँड चौक, क्राऊन हाॅटेल, टिकाराम चौक, महाराष्ट्र बँक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जाऊन खडकी बाजारातील जामा मशीद चौकात पोहोचेल आणि येथे सांगता होईल.
मिरवणुकीच्या मार्गांवर वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली असून मिरवणूक पार पडल्यावरच संबंधित रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.