पुणे: येरवडा मनोरुग्णालयात पुन्हा आत्महत्या; “सुरक्षा” फक्त कागदोपत्री?

0
06_07_2025-hang_1_23977244.jpeg

पुणे – येरवडा मनोरुग्णालयात कैद्यांची आत्महत्या आता “नित्याची बातमी” ठरली आहे. बुधवारी सकाळी आणखी एक धक्कादायक घटना घडली. लक्ष्मी अशोककुमार (वय ४५, रा. झज्जर, हरियाणा) या महिला कैदीने अंगावरील कपड्यांपासून दोरी बनवून खिडकीच्या गजाला गळफास घेतला. एवढ्या मोठ्या संस्थेत रुग्ण खिडकीला दोरी बांधतो आणि कोणाला सुगावा लागत नाही, हे प्रशासनाच्या बेफिकीरीचे मोठे उदाहरण मानावे का?

लक्ष्मीला परभणी कारागृहातून मानसिक उपचारासाठी ३१ जुलै रोजी येथे दाखल करण्यात आले होते. पण “उपचार” होण्याऐवजी तिने मृत्यूला कवटाळले. या आधीही १० ऑगस्ट रोजी एका पुरुष कैद्याने पायजम्याच्या साहाय्याने आत्महत्या केली होती. म्हणजे महिनाभरात दोन आत्महत्या! मग रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था नेमकी आहे तरी कुठे?

रुग्णांच्या सुरक्षेचे दायित्व असलेले अधिकारी, कर्मचारी नेमके काय करतात, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. वॉर्डात रुग्ण कपड्यांपासून दोरी तयार करतो, खिडकीच्या गजाला बांधतो आणि गळफास घेतो, तरीही कोणीच थांबवू शकत नाही, ही दुर्दैवी शोकांतिका प्रशासनाच्या “जबाबदारीशून्य” भूमिकेचे दर्शन घडवते.

दरम्यान, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मनोरुग्णालय प्रशासनानेही “अंतर्गत तपास” सुरू केल्याचे सांगितले आहे. पण मागच्या घटनेनंतर केलेला तपास नेमका कोणत्या गजाला लटकला, याची माहिती प्रशासनाने दिली तर बरे होईल.

रुग्णालयातील सततच्या आत्महत्यांनी “मनोरुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर” आला असला, तरी ठोस उपाययोजना करण्याऐवजी अधिकारी केवळ फाईल हलवण्यात गुंतलेले दिसतात. शेवटी, प्रश्न एकच – येरवडा मनोरुग्णालय हे उपचार केंद्र आहे की आत्महत्यांचे ठिकाण?


Spread the love

Leave a Reply