येरवडा: राजीव गांधी रुग्णालयात रुग्णांशी अमानुष वागणूक; आठ वर्षाच्या मुलाला दाखवायला आलेल्या पालकांना ओपीडी मधून हाकलले; नातेवाईकांचा संताप
पुणे – येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयातील आरोग्यसेवेबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. रात्रीच्या वेळी आठ वर्षांच्या मुलाला दाखवण्यासाठी आलेल्या रुग्ण व नातेवाईकांना डॉक्टर आणि महिला सुरक्षारक्षकांनी ओपीडीमधून बाहेर हाकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पहा व्हिडिओ
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार – “डॉक्टरांनी मुलाला हातसुद्धा लावला नाही, कागदपत्र पाहिले नाहीत. आम्ही वारंवार विनंती करूनही आमचे म्हणणे ऐकले गेले नाही. उलट आम्हाला सांगण्यात आले की येथे फक्त एक महिन्याच्या आतमधील बाळांनाच ऍडमिट केले जाते.”
आयसीयू नावापुरता?
राजीव गांधी रुग्णालयात लहान मुलांचा आयसीयू मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात येथे फक्त डिलिव्हरी पेशंटच्या बाळांना ऍडमिट केले जाते, अशी टीका होत आहे. खाजगी रुग्णालयांतून रेफर होणाऱ्या लहान मुलांना येथे दाखल न करता त्यांना थेट ससून किंवा कमला नेहरू रुग्णालयात पाठवले जाते.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की – “जेव्हा आयसीयूची सुविधा आहे, तेव्हा एक ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलांची तपासणी व दाखल प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे. अन्यथा हा केवळ दिखावा ठरतो.”
नातेवाईकांचा आक्रोश, प्रशासन मौन
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी विचारणा केली आहे की – “रुग्णांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या डॉक्टर आणि महिला सुरक्षारक्षकावर कारवाई होणार का?”
आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्याशी या प्रकरणाबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मोबाईलवर त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही.
नागरिकांची अपेक्षा
आरोग्यसेवेचा उद्देश रुग्णांचे प्राण वाचवणे हा असतो. अशा वेळी रुग्णालयाच्या गेटवरून किंवा ओपीडीमधून रुग्णांना हाकलणे हे केवळ अमानवी नव्हे तर गैरजबाबदार वर्तन ठरते. प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, हीच सर्वसामान्यांची मागणी आहे.
—