पुणे: बॉयफ्रेंडला मेसेज का केला? – येरवड्यात मुलींचा राडा, शाळेचे आवार झाले आखाडा – व्हिडिओ व्हायरल

पुणे : “माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केला?” या क्षुल्लक कारणावरून येरवडा परिसरात दोन मुलींच्या गटात चांगलाच राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेताजी शाळेच्या परिसरात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
बघा व्हिडीओ
सुरुवातीला दोन मुलींमध्ये वाद सुरू झाला. “तू माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलास?” असा जाब विचारत वादाला सुरुवात झाली. त्यानंतर हा वाद हाणामारीत परिवर्तित झाला. काही वेळातच या वादात आणखी मुली सहभागी झाल्या आणि दोन टोळ्यांमध्येच झिंज्या ओढणे, लाथाबुक्क्या, गलिच्छ शिव्यांचा भडिमार सुरू झाला.
शाळेच्या आवारातच झालेला हा तमाशा पाहून नागरिक थबकले. मुलींच्या हातघाईच्या भांडणामुळे परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शाळेचे आवारच आखाड्यात रूपांतरित झाले, असे दृश्य व्हायरल व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.
या प्रकारामुळे परिसरातील पालक आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शाळेच्या आवारात अशा प्रकारचे राडे होत असतील, तर मुलांचे संस्कार आणि सुरक्षितता यांचा प्रश्न गंभीरपणे उभा राहतो,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.