पुणे: आरटीओ निरीक्षक पदोन्नतीत कोट्यवधींचा नजराणा? निरीक्षकांच्या पदोन्नतीत ४०-४० लाखांचा व्यवहार? ६६ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार, पण कारवाई शून्य!

पुणे, दि. २० :
परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचे नवे प्रकरण प्रकाशझोतात आले असून, मोटार वाहन निरीक्षकांच्या पदोन्नतीत कोट्यवधी रुपयांचा ‘नजराणा’ घेतल्याचा आरोप झाला आहे.
राज्यातील तब्बल ३३१ सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदोन्नती मोटार वाहन निरीक्षक म्हणून होत आहे. मात्र, या पदोन्नतीतील पदस्थापनेदरम्यान ‘चॉइस पोस्टिंग’ मिळवण्यासाठी सुमारे २० निरीक्षकांकडून प्रत्येकी ४० लाख रुपये घेण्यात आल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, पनवेल येथील एका हॉटेलमध्ये थेट व्यवहार झाला, तर या वसुलीमध्ये परिवहन आयुक्तालयातील वादग्रस्त अधिकारी ‘बी.के.’ आणि एका मंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
यापूर्वीही अशाच प्रकारे बेकायदेशीर वसुली करणारा सचिन पाटील याच्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर केले होते. मात्र, त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
दरम्यान, या सर्व आरोपांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया देताना,
“परिवहन विभागाच्या ६६ अधिकाऱ्यांविरोधात झालेल्या तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नाही. अद्याप पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, पुरावे मिळाल्यास निश्चितच कारवाई केली जाईल. तक्रारीची चौकशी केली जाईल,” असे स्पष्ट केले.
मुख्य मुद्दे :
३३१ निरीक्षकांची पदोन्नती प्रक्रिया सुरू.
२० निरीक्षकांकडून प्रत्येकी ४० लाखांचा ‘नजराणा’ घेतल्याचा आरोप.
व्यवहार पनवेलमधील हॉटेलमध्ये झाल्याची माहिती.
सचिन पाटीलविरोधात यापूर्वीही तक्रार, पण अद्याप कारवाई नाही.
परिवहन मंत्री : “पुरावा मिळाल्यास कारवाई करू.”
—