पुणे: कामगार आयुक्त कार्यालयाकडे महिलांचा सवाल – “आम्ही किती वेळा दार ठोठवायचं?” “फक्त आश्वासनं नको, अंमलबजावणी करा” – घरेलू कामगारांचा हल्लाबोल

0
IMG_20250817_115850.jpg

पुणे : कामगार विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनदेखील विविध प्रश्न मार्गी लागले नाहीत. यामुळे नाराज झालेल्या पाचशेहून अधिक घरेलू कामगार महिलांनी गुरुवारी (ता. १४) विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.

पूर्वीच्या महायुती सरकारने ३१ जुलै २०२४ पर्यंत नोंद झालेल्या सर्व घरेलू कामगार महिलांना गृहोपयोगी भांड्यांचा संच देण्याची घोषणा केली होती. परंतु जेमतेम ३० टक्के अर्जदारांनाच संच देण्यात आला आणि निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून उर्वरित वाटप थांबवण्यात आले. सत्तांतरानंतरही हा प्रश्न प्रलंबितच राहिल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

“वारंवार निवेदने देऊनही कामगार आयुक्त कार्यालय हलत नाही. सरकार केवळ आश्वासनावर चालते, पण अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करते,” अशी महिलांची टीका आहे. त्यांनी इशारा दिला की, प्रश्न सोडवला नाही तर बेमुदत ठिय्या आंदोलन उभारले जाईल.

मोर्चादरम्यान महिलांनी किमान वेतन, आठवड्याची पगारी सुट्टी, ६० वर्षांवरील घरेलू कामगारांना मासिक पेन्शन, गरोदर महिलांना मातृत्व लाभ, विमा योजना आणि पाल्यांसाठी शिष्यवृत्ती यांसारख्या कल्याणकारी मागण्या जोरदारपणे मांडल्या.

या आंदोलनाची दखल घेत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तातडीने मुंबईतील कामगार आयुक्तांशी संपर्क साधला. त्यानंतर लवकरच भांडी संच वाटप सुरू होणार असल्याचे समजते. तसेच कामगार आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या वेळी सीटूचे अध्यक्ष अजित अभ्यंकर, सचिव वसंत पवार, संघटनेच्या नेत्या किरण मोघे, सरस्वती भांदिर्गे, रेखा कांबळे, सुभद्रा खिलारे, हिराबाई घोंगे, अपर्णा दराडे, सुषमा इंगोले, संगीता केंद्रे, सावित्रीबाई कांबळे, बेबीताई सोनवणे आदी उपस्थित होत्या.

कामगार महिलांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा नाराजगीचं वादळ सरकारवर कोसळणार, अशी स्पष्ट चेतावणी या मोर्चातून देण्यात आली.

Spread the love

Leave a Reply