पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना : १ ऑगस्टला वाहतूक मार्गात बदल, काही रस्ते बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे प्रतिनिधी |
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात विविध कार्यक्रम व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, काही मार्ग तात्पुरते बंद राहणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सकाळी ७ वाजल्यापासून लागू होणाऱ्या या वाहतूक बदलांमुळे सारसबाग परिसर, सिंहगड रोड, जेधे चौक, पुरम चौक, सावरकर चौक आदी भागांतील वाहतूक वळवण्यात येणार आहे. दरम्यान, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व पोलिस यांसारख्या अत्यावश्यक सेवांना मात्र मुभा देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.
वाहतूक मार्गात होणारे बदल पुढीलप्रमाणे :
बालाजी विश्वनाथ पथ (जेधे चौक ते सारसबाग) वाहतुकीसाठी पूर्णतः बंद.
जेधे चौकाकडून सिंहगड रोडकडे जाण्यासाठी : सातारा रोड – व्होल्गा चौक – मित्रमंडळ चौक – सावरकर चौक हे पर्यायी मार्ग वापरावेत.
सिंहगड रोडवरून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक : दांडेकर पूल – नाथ पै चौक – ना.सी. फडके चौक – पुरम चौक – टिळक रोड – जेधे चौक मार्गे वळवण्यात येणार.
जेधे चौक वाय-जंक्शन (फ्लायओव्हर) वरून सारसबागकडे प्रवेश बंद.
कात्रजहून येणारी वाहने : लक्ष्मीनारायण (व्होल्गा चौक) येथून डावीकडे वळवण्यात येणार.
वेगा सेंटर ते सारसबाग ग्रेडसेपरेटर रस्ता वाहतुकीसाठी बंद.
राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक पर्यायी मार्ग उपलब्ध.
सावरकर चौक ते पुरम चौक दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद.
नाथ पै चौक – सावरकर चौक – दांडेकर पूल – ना.सी. फडके चौक – कल्पना हॉटेल – टिळक रोड – पुरम चौक पर्यायी मार्ग खुला.
दांडेकर पूल ते सावरकर चौक मार्ग बंद.
दांडेकर पूल – सावरकर चौक वाहतूक : दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत दुहेरी मार्गाने सुरू राहील.
निलायम ब्रिजवरून सावरकर चौकाकडे जाणारी वाहने : पर्वती गाव मार्गे वळवण्यात येतील.
वाहनचालकांसाठी सूचना :
वाहतूक बदलामुळे होणारा संभाव्य त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी नियोजनबद्ध प्रवास करावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांच्या सूचना पाळाव्यात.
पुणे पोलिसांकडून या संपूर्ण काळात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्थेस अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.