पुणे: कोंढवा परिसरात घर घेणार? आधी हे वाचा! अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हल्लाबोल; ७० हून अधिक इमारतींवर तोडक कारवाई होणार!

पुणे प्रतिनिधी –
कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असून, महापालिकेने याची गंभीर दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी महापालिकेने दोन बेकायदा इमारती जमीनदोस्त करत स्पष्ट इशारा दिला आहे – “या इमारतीत खरेदी केली, तर होऊ शकते फसवणूक!”
महापालिकेच्या बांधकाम विभागाने कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांवर मोठी मोहीम छेडली असून, यासाठी ४० अभियंत्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता दीपक सोनावणे यांच्या पथकाने कारवाईची सुरुवात केली.
या कारवाईत मलिकनगर येथील चार मजली आणि साईबाबानगरमधील तीन मजली अशा एकूण ३,८०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या आरसीसी इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे या इमारती धोकादायक अवस्थेत पोहोचल्या असून, नागरिकांनी अशा ठिकाणी वास्तव्य करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब पुढे आली असून, कोंढवा भागात सुमारे ७० ते ८० अनधिकृत इमारती बांधल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे. यातील अनेक इमारतींमध्ये नागरिक राहत असून, त्यांना लवकरच नोटिसा बजावून पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्याची योजना आखण्यात आली आहे.
दाट लोकवस्तीमुळे कारवाईस अडथळे
कोंढवा परिसर हा दाट लोकवस्तीचा भाग असल्यामुळे इमारती पाडताना प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही काळजीपूर्वक ही कारवाई सुरू असून, एक ते दोन महिन्यांत सर्व बेकायदा इमारती हटवण्यात येतील, असे अधीक्षक अभियंता बनकर यांनी स्पष्ट केले.
‘स्वस्त फ्लॅट’चा गंडा; नागरिकांची फसवणूक
कोंढव्यातील मोकळ्या जागांवर एक ते दीड गुंठ्यात तीन ते चार मजली इमारती उभारल्या जात आहेत. या इमारतींमध्ये स्वस्त दरात फ्लॅट विक्रीस काढले जात असून, काही भाड्यानेही दिले जात आहेत. या व्यवहारांमध्ये नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.
राज्य अधिवेशनातही कोंढव्यातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर तोडगा म्हणून महापालिकेने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून, कठोर शिक्षा करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नागरिकांनी सतर्क राहावे, खरेदीपूर्वी तपासणी करावी
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही सदनिका खरेदी करण्यापूर्वी संबंधित इमारतीला बांधकाम परवाना आहे का, याची खातरजमा करावी. अन्यथा फसवणुकीचा बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
—
टीप :
बेकायदा बांधकामाच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईसंदर्भात अधिक माहितीसाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा बांधकाम परवाना विभागाशी संपर्क साधावा.