पुणे: कोंढव्यात अमली पदार्थ प्रकरणी दोन तरुणांना अटक; लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने कारवाई
सात लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे : कोंढवा परिसरात अमली पदार्थ विक्रीस प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कारवाईसाठी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने (मिलिटरी इंटलिजन्स) पोलिसांना महत्त्वाची माहिती पुरवली होती.
पहिल्या प्रकरणात धर्मावत नगर परिसरात एक तरुण कारमधून ओझीकुश गांजा (रासायनिक प्रक्रिया केलेला गांजा) घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचत अभिनव प्रदीप गुप्ता (वय २२, रा. लक्ष्मण पार्वती सोसायटी, शिवणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ ग्रॅम ओझीकुश गांजा, एक मोबाइल संच असा एकूण ९६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत कोंढवा परिसरातील पारगेनगर येथून इर्शाद इफ्तीखार शेख (वय २७, रा. होमवुड सोसायटी) याला मेफेड्रोनसह अटक करण्यात आली. त्याच्याकडून पाच लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन, एक मोटार, दोन मोबाइल संच, इलेक्ट्रिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या असा एकूण सात लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही कारवायांमध्ये गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे तसेच कर्मचारी विशाल दळवी, विनायक साळवे, मारुती पारधी, दयानंद तेलंगे, नागनाथ राख, नितीन जाधव, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, सुहास डोंगरे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, अक्षय शिर्के यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांनी या प्रकरणांमध्ये अधिक तपास सुरू केला असून, संबंधित आरोपींच्या नेटवर्कचा शोध घेण्यात येत आहे.