राज्यात बनावट औषधांचा मोठा खुलासा; ११ कंपन्यांचे परवाने रद्द, ७८ गुन्हे दाखल

0
bded93676e77eab534754c9d03df61f117335472461211063_original.jpeg

मुंबई : राज्यातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमध्ये वितरित करण्यात येणाऱ्या ९७९ औषधांचे नमुने तपासले असता, त्यापैकी ११ औषधांमध्ये मूळ औषध घटकच नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मे. विशाल एंटरप्रायजेस (कोल्हापूर), जया एंटरप्रायजेस (लातूर), ऍक्टिव्हेंटिस बायोटेक प्रा. लि., जेनेरिसेज आणि कॅबिज जेनेरिक हाऊस (ठाणे) या कंपन्यांचे परवाने तत्काळ रद्द केले असून, ११ कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधान परिषदेच्या सभागृहात दिली.

रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ
राज्यातील सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये तसेच औषध विक्रेत्यांकडून रुग्णांना निकृष्ट दर्जाची आणि बनावट औषधे दिली जात असल्याचे समोर आले आहे. काही औषधांमध्ये तर औषधाचा मूळ घटक नसून त्याऐवजी टॅल्कम पावडर वापरल्याचे संभाजीनगरमधील प्रयोगशाळेच्या अहवालात निष्पन्न झाले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा गंभीर मुद्दा सभागृहात उचलून धरला.

बनावट कंपन्यांचे जाळे उघड
उत्तराखंड, केरळ, आंध्र प्रदेशातील काही औषध कंपन्यांचे लेबल वापरण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अशा कंपन्यांचे अस्तित्वच नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. औषधांमध्ये घटक तपासणीच्या नावाखाली ब्रँडेड कंपन्यांचेच नमुने तपासले जातात, तर गुणवत्ताहीन कंपन्यांच्या औषधांना दुर्लक्ष केले जाते, असा आरोप दानवे यांनी केला.

एफडीएची कारवाई; समितीची स्थापना
एप्रिल २०२३ ते मार्च २०२५ या कालावधीत राज्यभरात ७८ एफआयआर दाखल झाले असून ४४८३ परवाने निलंबित व ५७५ परवाने रद्द करण्यात आले आहेत. दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई सुरू असून, औषध पॅकिंगवर नमूद घटकांची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे झिरवळ यांनी स्पष्ट केले.

औषध निरीक्षकांवरही संशयाची सुई
औषध परवाने देण्याचे अधिकार विभागीय सहआयुक्तांकडे विकेंद्रित करण्यात आले आहेत. औषध नियंत्रक अधिकारी हे परवाना प्राधिकारी नसल्याचे मंत्री झिरवळ यांनी सांगितले. तथापि, या अधिकाऱ्यांवरही संगनमताचे आरोप झाल्याने त्यांच्याविरोधात तक्रारींची चौकशी सुरू आहे.

सात आरोपींपैकी पाच कोठडीत
या प्रकरणात सात आरोपींचा समावेश असून, त्यापैकी दोन जणांना जामीन मिळाला आहे. उर्वरित पाच आरोपी अद्याप कोठडीत असल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.

औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ
राज्यातील औषध विक्रेत्यांमध्ये या कारवाईमुळे मोठी खळबळ माजली आहे. FDA च्या या धडक तपासणीमुळे नागरिकांच्या आरोग्यासोबत होणारा खेळ उघड झाला असून, आगामी काळात अशा बनावट औषधांवर अधिक प्रभावी कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed