पुणे विभागात लाचखोरीची साथ! १३२ अधिकारी गजाआड; रावेत पोलिस ठाण्यातील महिला हवालदारासह दोघे अटकेत

पुणे : पुणे विभागात सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. १९ जुलै २०२५ पर्यंतच्या अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)च्या आकडेवारीनुसार, यंदा लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, एकूण १३२ लाचखोर अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ही आकडेवारी औरंगाबाद विभागाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
याच पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हवालदार राजश्री रवी घोडे आणि सहायक फौजदार राकेश शांताराम पालांडे या दोघांना ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही धक्कादायक कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
घोडे आणि पालांडे हे रावेत पोलिस ठाण्यात कार्यरत असून, त्यांनी एका वकिलाकडे गुन्हा नोंदवलेल्या प्रकरणात अटक न करण्याच्या मोबदल्यात ५० हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने एसीबीकडे धाडसाने तक्रार केली. पडताळणीदरम्यान लाच मागणी स्पष्ट झाल्यानंतर, घोडे यांना ३० हजारांची लाच स्वीकारताना पकडले गेले, तर पालांडे यांना राहत्या घरी अटक करण्यात आली.
दरम्यान, महसूल आणि पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांकडून लाच घेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे. या घटनांमुळे सर्वसामान्य जनतेत संतापाची भावना असून, पोलिस आयुक्तालयाने तातडीने विशेष तपास पथक नेमले आहे. लाचखोरी रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवली जातील, असे आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.