पुणे: कोंढवा भाजी विक्रेत्यांचा संघर्ष अखेर यशस्वी! असलम बागवान यांच्या सत्याग्रहाला यश – व्हिडिओ

पहा व्हिडिओ
पुणे (कोंढवा) | प्रतिनिधी –
कोंढवा परिसरातील भाजी विक्रेते, पथारी व्यावसायिक यांना अखेर त्यांच्या हक्काच्या जागा मिळाल्या आहेत. मागील २६ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आणि सत्याग्रहाला यश मिळाल्याचे समाधान व्यक्त होत आहे. इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम बागवान यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून शीतल पंपाच्या मागील जागा तसेच कुमार पृथ्वी सोसायटीसमोरील ओटा मार्केटची जागा या व्यावसायिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पालिकेतील महत्त्वपूर्ण बैठक आणि निर्णय
१७ जुलै रोजी पुणे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत सर्व संबंधित अधिकारी, भाजी विक्रेते, सामाजिक कार्यकर्ते आणि असलम बागवान उपस्थित होते. या बैठकीत जागा निश्चितीचा निर्णय घेण्यात आला. यासाठी नीलम अय्यर, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे काशीनाथ नखाते, मासूम संस्था, जनआंदोलनाची राष्ट्रीय समन्वयक समिती तसेच विविध राजकीय पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला.
सत्याग्रह मागील संघर्षाचा धगधगता इतिहास
२४ जून २०२५ पासून सुरू झालेला हा संघर्ष केवळ जागेपुरता मर्यादित नव्हता. कोंढव्यातील वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे आणि डिपी रोडवरील राजकीय आंदोलन यांमुळे अचानक आठवडा बाजारावरील कारवाई झाली. यानंतर पथारी व्यावसायिक आणि शेतकरी यांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले. काही माजी नगरसेवक आणि समिती अध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे या व्यावसायिकांना धमकावले गेले, आमिषे दाखवली गेली, त्यांच्या मालमत्तांवर ताबा घेतला गेला.
गांधीजींच्या मार्गाने शांततामय लढा
या अन्यायाविरोधात असलम बागवान यांनी भारतीय संविधान व गांधीजींच्या विचारसरणीला धरून सत्याग्रह सुरू केला. हातगाडीधारक, शेतकरी, महिला, पथारी व्यावसायिकांनी कोणतेही हिंसक किंवा बेकायदेशीर कृत्य न करता शांततेत आंदोलन चालू ठेवले. या आंदोलनाला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झाले, महिलांविरोधात अश्लील भाषा वापरण्यात आली, पण आंदोलनकर्ते खंबीर राहिले.
अखेर विजयाचा झेंडा
सततचा संघर्ष, आंदोलकांची निष्ठा आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा यामुळे अखेर कोंढवा भाजी विक्रेत्यांना हक्काची जागा मिळाली आहे. हा विजय केवळ जागेचा नाही, तर संविधानिक हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा विजय आहे.
—