रांजणगाव गणपतीतील बाजारपेठ अवैध धंद्यांचे अड्डे बनले! ग्रामस्थ संतप्त, प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी

रांजणगाव गणपती (ता. शिरूर, जि. पुणे) –
प्रसिद्ध गणपती मंदिराच्या सान्निध्यात असलेल्या बाजार परिसरात अवैध व्यवसायांचे साम्राज्य बळावत चालले आहे. पवन गेम्स, फाईव्ह स्टार, सट्टा, मद्यविक्री यांसारखे व्यवसाय खुलेआम सुरू असून, यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडू लागले आहे. विशेषतः शाळेच्या शेजारीच हे गैरकायदेशीर प्रकार सुरू असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
पहा व्हिडिओ
“मुलांच्या सुरक्षिततेवर गदा” – ग्रामस्थांचा इशारा
गावातील नागरिकांनी एकमुखाने प्रशासनाला जाब विचारत म्हटले की, “आमच्या मुलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सगळं बंद नाही झालं, तर गावातील पुढचं पिढीच बिघडेल. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कठोर पावले उचलावीत.”
गावाची प्रतिमा मलीन होतेय… पण प्रशासन मौनात!
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या अवैध धंद्यांमुळे रांजणगाव गणपतीसारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणाची बदनामी होत आहे. पर्यटनासाठी आणि धार्मिक श्रद्धेसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावाचे नाव आता गुन्हेगारीशी जोडले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांची मागणी स्पष्ट : तात्काळ बंदी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई!
ग्रामस्थांनी ठामपणे मागणी केली आहे की –
बाजार परिसरातील पवन गेम्स, फाईव्ह स्टार, सट्टा व मद्यविक्रीसारखे सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत.
या धंद्यांना संरक्षण देणाऱ्या आणि त्यामध्ये सामील असलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
प्रशासन जागं होणार की गावकऱ्यांचा संयम सुटणार?
रांजणगाव गणपतीचे ग्रामस्थ सध्या प्रशासनाच्या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत. मात्र, जर प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई केली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
गावाची शांती आणि प्रतिष्ठा वाचवण्यासाठी प्रशासन पुढे येणार का? की हे अवैध धंदे असाच बिनधास्तपणे फोफावत राहणार?
याचे उत्तर लवकरच स्पष्ट होईल…