रांजणगाव पोलिसांच्या हद्दीत खुलेआम लाल काला जुगार ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कारेगाव व आठवडी बाजारात जुगाराचे चार अड्डे सक्रीय, पोलिसांची डोळेझाक?

रांजणगाव (प्रतिनिधी) – रांजणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत कायद्याचे तीनतेरा वाजले आहेत. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कारेगाव येथे दर रविवारी भरणाऱ्या बाजारात लाल काला जुगार堂 उघडपणे सुरू असून, चार ठिकाणी हे अवैध अड्डे चालू असल्याची माहिती समोर आली आहे.
हे अड्डे इतके उघडपणे चालू आहेत की सामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असून, या गैरप्रकारांमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, रांजणगावचा बुधवारी भरणारा आठवडी बाजारसुद्धा आता लाल काला जुगाराच्या विळख्यात अडकला आहे.
पहा व्हिडिओ
गेल्या काही महिन्यांपासून या भागात खंडणी, लूटमार, जुगार व इतर अवैध धंद्यांना ऊत आला आहे. मुख्य बाजारपेठ आणि आसपासच्या परिसरात सर्रास जुगार खेळला जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
पोलिस स्टेशन इतक्या जवळ असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने पोलिस प्रशासनावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. अनेक नागरिकांनी या परिस्थितीविरोधात संताप व्यक्त केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस अधीक्षक व विभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. अन्यथा नागरिकांचा संयम सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.