पुणे : कोंडीचा प्रश्न गंभीर, पण पोलिसांना दंड वसुलीचं वेड ! पुरम चौकात अनधिकृत वसुली; तीन वाहतूक पोलीस निलंबित

traffic-police-5.jpg

पुणे, ८ जून — पुणे वाहतूक विभागात मोठी हलचाल निर्माण करणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी ड्युटी न बजावता इतरत्र जाऊन अनधिकृत दंड वसुली करणाऱ्या तीन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये १) संतोष चंद्रकांत यादव, २) बालाजी विठ्ठल पवार आणि ३) महिला पोलीस शिपाई मोनिका प्रवीण करंजकर यांचा समावेश आहे. संबंधित पोलिसांनी आपली ड्युटी SP चौक, हिराबाग चौक आणि भावे चौक येथे असतानाही ती टाळून पुरम चौकात जाऊन वाहनचालकांकडून दंड वसूल केल्याचं निदर्शनास आलं.

ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ कारवाई करत तिघांनाही निलंबित करण्यात आलं. वाहतूक नियंत्रणाऐवजी फक्त दंड वसुलीवर भर दिला जात असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना होण्याऐवजी ती अधिक तीव्र होत आहे, अशी तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पुणेकरांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, अन्य भागांतही अशाच प्रकारची नियमबाह्य वसुली सुरू असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने इतर भागांतही स्टिंग ऑपरेशन करून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

वाहतूक पोलिसांच्या शिस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Spread the love

You may have missed