Maharashtra Election 2024: पोलिसांच्या नियोजनामुळे मतदान शांततेत पार पडले; आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची माहिती

0

पुणे: शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादाचे प्रकार वगळता कोणतीही अनुचित घटना घडली नाही, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

मतदान सुरळीत पार पडावे म्हणून पुणे पोलिसांनी व्यापक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. मतदान प्रक्रियेसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रत्येक विभागाचे पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांसह ६०० पोलीस अधिकारी, ६८०० पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे १७५० जवान, तसेच राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय सुरक्षा दलाच्या १७ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी त्वरित हस्तक्षेप होईल, अशी योजना आखण्यात आली होती. शीघ्र कृती दलाच्या तुकड्या संवेदनशील भागात तैनात केल्या होत्या. पोलिसांनी मतदान केंद्र परिसरात वाहने लावण्यास बंदी घालून, दुकाने व व्यावसायिक कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे मतदान केंद्र परिसरात शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पाच ते दहा मिनिटांत पोलिसांची उपस्थिती सुनिश्चित केली गेली होती. पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या शिरूर, पुरंदर आणि खडकवासला मतदारसंघांतील मतदान केंद्रांवरही विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

“योजनाबद्ध बंदोबस्तामुळे मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले,” असे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *