२० नोव्हेंबरला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी; मतदानासाठी बँका व सरकारी कार्यालये बंद
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून, या दिवशी राज्यभर सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व सरकारी कार्यालये, बँका आणि संबंधित संस्था बंद राहणार आहेत.
बँकांमध्ये आर्थिक व्यवहार बंद, डिजिटल सेवा सुरू
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार, २० नोव्हेंबर रोजी बँकांमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. मात्र, ग्राहकांसाठी मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सेवा सुरू राहतील. त्यामुळे डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध असेल. तरी, ज्यांना बँकेच्या शाखांमध्ये जाऊन कामे करायची आहेत, त्यांनी ती २० नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कंपन्यांना कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे बंधनकारक
मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले की, सर्व खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी द्यावी. कोणत्याही कंपनीने हा नियम मोडल्यास कडक कारवाई होईल. या सुट्टीचा उद्देश नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वेळ आणि संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
आपत्कालीन सेवा सुरूच राहणार
सार्वजनिक सुट्टी असूनही सर्व अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
२८८ मतदारसंघांसाठी मतदान; निकाल २३ नोव्हेंबरला
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यंदा ४,१४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल स्पष्ट होईल.
नागरिकांनी आपापल्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.