करमणूक केंद्राच्या नावाखाली जुगार! चिंचवडमध्ये ३१ जणांवर कारवाई; १८ लाखांचा जुगार मुद्देमाल जप्त
चिंचवड – चिंचवड पोलिसांनी ओम कॉलनी, बिजलीनगरमधील आधार बहुउद्देशीय संस्थेत तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून ३१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे १८ लाख ६ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मादाय आयुक्तालयाकडून आधार बहुउद्देशीय संस्थेला करमणूक केंद्राचा परवाना देण्यात आला होता. मात्र, त्या ठिकाणी अवैध जुगार खेळ सुरू असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत छापा टाकला.
या कारवाईत अनेक जण तिथे जुगार खेळताना आढळले. पकडलेले आरोपी दावनमलिक नदाफ, भावेष शहा, भगवान भोई, नितीन सूर्यवंशी, जब्बार शेख यांच्यासह अनेकांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी तीन पत्तीचा जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाले.
तसेच, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या परवानाधारक अभिमान मोहन मिसाळ आणि त्याचे कामगार नितीन राठोड, श्रीनिवास चलवादी, प्रीतम कुमार यांनी करमणूक परवान्याचा भंग करून जुगार खेळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या सर्वांवर महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून जुगाराची साधने, मोबाईल, वाहने इत्यादी जप्त करण्यात आले आहेत.
चिंचवड पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या प्रकरणात आणखी काही नवीन माहिती मिळण्याची शक्यता आहे.